अकोले –
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने हाहाकार माजला आहे. देवठाण गाव शिवारातील शेळके वस्ती परिसरात अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय बालिकेला बिबट्याने झडप घालून उचलून नेले. काही वेळानंतर तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात भीतीचे आणि शोकमय वातावरण पसरले आहे.
मयत चिमुकलीचे नाव कविता लहानु गांगड (वय ३) असे असून, सायंकाळच्या सुमारास ती घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने झडप घालत उचलून नेले. गावकऱ्यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धाव घेतली, मात्र तो उसाच्या दाट शेतात गायब झाला.
काही वेळाने ग्रामस्थांनी शोध घेतल्यावर सुमारे ३०० मीटर अंतरावर ऊसाच्या शेतात कवितेचा मृतदेह आढळला. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता. संपूर्ण गावात हळहळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही मे महिन्यात याच देवठाण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे (वय ५७) या महिलेचा मृत्यू झाला होता. पुन्हा झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, त्यांनी नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.





