रावेर, ता. – रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील दोन विद्यार्थिनींनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायतीतर्फे विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.
निंभोरा येथील निकिता समाधान कोळी (बी.एस.सी – रसायनशास्त्र) व मुस्कान मुनाफ पटेल (बी.ए – इतिहास) या विद्यार्थिनी ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. दोघींनी गुणवत्ताप्राप्ती करत विद्यापीठाच्या यादीत झळकले आहे.
दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरपंच निर्मलाताई कोळी व उपसरपंच रंजनाताई प्रशांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व पेढा भरवून गौरव करण्यात आला.
सरपंच निर्मलाबाई कोळी म्हणाल्या, “जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांमध्ये आमच्या गावच्या मुलींनी चमक दाखवली आहे, याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे.”
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून यश संपादन करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींचे संपूर्ण गावभर कौतुक होत आहे.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी बऱ्हाटे, शाहीन दस्तगीर खाटीक, मनोहर तायडे, युनूस मिस्तरी, मधुकर बिऱ्हाडे, संदीप महाले, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निलेश भंगाळे, राहुल महाले, ललित दोडके, विनोद गोराडकर, चंद्रकांत गवळी, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.





