भोकरदन प्रतिनिधी – भोकरदन शहराजवळील डावरगाव फाट्यावर आज (१९ ऑक्टोबर २०२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर मृत व्यक्तीचे नाव परमेश्वर लोखंडे (वय २७, रा. भोकरदन) असे असून, प्राथमिक तपासानुसार त्याचा खून लोखंडी रॉडने डोक्यात मारून करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना त्या ठिकाणी एक क्रूझर गाडी सुद्धा आढळून आली आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मामानेच आपल्या भाच्याचा जागेच्या वादातून खून केला. या प्रकरणी अनिल कांबळे आणि अर्जुन रमफळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे भोकरदन आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू ठेवला आहे.





