यावल – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी यावल येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता मा. प्रतिभाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, हारून शेख, तथा ज्येष्ठ नेते भगतसिंग बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीत सुरुवातीस तालुकाध्यक्ष रितेश पाटील यांनी ग्रामीण भागातील संघटनात्मक स्थिती व कार्यकर्त्यांच्या तयारीचा आढावा मांडला, तर शहराध्यक्ष राजेश करांडे,कार्याध्यक्ष कदिर खान यांनी शहरातील प्रभागनिहाय संघटनेची माहिती दिली.
मुख्य मार्गदर्शन करताना भगतसिंग बापू यांनी जुने व नवे कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी एकदिलाने काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदेश प्रवक्ता मा. प्रतिभाताई शिंदे यांनी आपल्या प्रभावी भाषणात आदिवासी, महिला व युवक वर्गाला मोठ्या प्रमाणावर पक्षात संधी द्यावी, प्रत्येक गावागावात व शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा आणि सर्वानुमते योग्य उमेदवार निवडून पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आणावे असे मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, मित्र पक्षांशी युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्यास सज्ज आहे. “या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उंच फडकवतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत ॲड. देवकांत पाटील यांनी। ग्रामीण भागातील निवडणुकीसाठी माहिती दिली, तर आभार प्रदर्शन प्रा. अर्जुन पाटील यांनी मानले. या बैठकीस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृह ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंदाबाद’ या घोषणांनी दणाणून गेले.





