जळगाव- बुधवारी दुपारी सुमारास जळगाव शहरासह परिसरात अचानक झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे व्यवसायिकांची मोठी तारांबळ उडाली. जळगावातील जीएस मैदानावर लावण्यात आलेल्या फटाका स्टॉलधारकांचे पत्रे व साहित्य उडाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुपारी चारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची व दुकानदारांची एकच धांदल उडाली.
पाडवा सणानिमित्त सुभाष चौक परिसरासह विविध भागांत हातगाडी व तात्पुरते व्यावसायिक आपली दुकाने लावून बसले होते; मात्र या अवकाळी पावसाचा त्यांना फटका बसला. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही आज पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.





