बेंगळुरू – बेंगळुरूच्या ग्रामीण भागातील गंगोदनहल्ली गावात महिलेशी अमानुष वर्तन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री काही तरुणांनी दारूच्या नशेत घरात घुसून एका महिलेशी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित महिला मूळची कोलकात्याची असून ती बेंगळुरूतील भाड्याच्या घरात राहत होती. घटनेनंतर तिने तातडीने मदनायकनहल्ली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्हा केल्यानंतर महिलेकडील दोन मोबाईल आणि ₹२५,००० रोख रक्कम लुटल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. फरारी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून तपास सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
दरम्यान, महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात काही दिवसांपूर्वीही एका तरुणीशी अमानुष वर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





