कल्याण – कल्याण शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी एका नशेखोराने भरदिवसा स्थानिक दुकानदारावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना गुरुवारी कल्याणमधील बिर्ला कॉलेज रोड परिसरात घडली असून, या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने दारूच्या नशेत ५० रुपयांसाठी दुकानदाराशी वाद घातला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्याने चाकूने हल्ला करून दुकानदाराला गंभीर जखमी केलं. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.
हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तो यापूर्वी एमपीडीए अंतर्गत दीड वर्ष तुरुंगात होता आणि काही दिवसांपूर्वीच सुटून बाहेर आला होता. दुर्दैवाने, ही घटना पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांनी नियमित गस्त वाढवून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.





