सोयगाव – सोयगाव तालुक्यातील जरंडी या छोट्याशा गावात अवैध देशी दारू आणि सट्ट्याच्या पिड्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात सध्या सात देशी दारूची दुकाने आणि दोन सट्ट्याच्या पिड्या उघडपणे सुरू आहेत. यातील तीन दुकाने आणि दोन सट्ट्याच्या पिड्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर, तर एक दुकान ग्रामपंचायतीलगत आणि दुसरे महात्मा जोतीबा फुले हायस्कूलजवळ सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रामपंचायतीला “ग्राम स्वच्छता अभियान – वसुंधरा” अंतर्गत मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळाला असूनही, गावात दोन नंबरचे व्यवसाय सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
स्थानिकांच्या मते, हे सर्व व्यवसाय काही दादागिरी करणाऱ्या व्यक्तींच्या छत्राखाली सुरू आहेत. गावात अवैध धंदे चालू असूनही पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन अवैध दारू विक्री व सट्टा व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.





