अमळनेर – जामनेर आणि अमळनेर तालुक्यातील गुरे चोरीप्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींनी पोलिसांच्या वाहनातून बेड्या तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजता कुऱ्हे रेल्वे अंडरपास परिसरात घडली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लोणे व पिंपळे परिसरातून सात गुरे चोरीला गेल्याच्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून एक संशयास्पद दुचाकी (एमएच-१९ बीबी-५१९८) आढळली. चौकशीत ही दुचाकी अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) याची असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत आणखी चार साथीदारांची नावे उघड झाली.
संशयितांमध्ये शाकीर शाह अरमान शाह (३०, सुप्रीम कॉलनी), अमजद शेख फकीर कुरेशी (३५, मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (नशिराबाद) आणि तौसिफ शेख नबी (फातिमा नगर, जळगाव) यांचा समावेश आहे. या टोळीने अमळनेर व पहुर परिसरात एकूण दहा गुरे चोरल्याचे कबूल केले असून, त्यांनी पिकअप वाहन (एमएच-१९ सीव्ही-७१६९) वापरल्याचेही उघड झाले.
पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. मात्र रात्री स्पॉट व्हेरिफिकेशनदरम्यान कुऱ्हे रेल्वे अंडरपासजवळ वाहन थांबवण्यात आले असता, मागील सीटवर बसवलेले शाकीर शाह अरमान शाह व अमजद शेख फकीर कुरेशी हे दोघे अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेले.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली, मात्र अद्याप आरोपी फरार आहेत. उर्वरित दोघांना अमळनेर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. फरार आरोपींविरुद्ध कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.





