जळगाव – जळगाव रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. २४ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातात धावत्या रेल्वेचा धक्का लागून मध्यप्रदेशातील एका परप्रांतीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत व्यक्तीची ओळख राजेश कटारिया (वय ४२, रा. पिंप्री, जि. देवास, मध्यप्रदेश) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते रेल्वे रुळांच्या जवळ असताना धावत्या रेल्वेचा धक्का बसल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली, तर पुढील तपास जळगाव रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.





