पुणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते अतुल देशमुख हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भागात शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा निरोप घेणारे देशमुख आता शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना बळ देणारे हे नेतृत्व ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
अतुल देशमुख हे उत्तर पुण्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय नेते असून, खासदार अमोल कोल्हेंच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जाते.
नाराजी आणि अंतर्गत कलहामुळे निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारल्यामुळे देशमुख यांच्यात नाराजी निर्माण झाली होती. तसेच स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत मतभेद आणि दुफळी यामुळे त्यांनी अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशमुखांचा शिंदे गटात प्रवेश होणार असून, त्यामुळे उत्तर पुण्यात नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी मोठे धक्के बसले आहेत. बुलडाणा, हिंगोली आणि अहमदनगर येथील जिल्हाध्यक्षांनी नुकतेच राजीनामे सादर केले. हिंगोलीचे दिलीप चव्हाण, बुलडाण्याच्या रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे राजेंद्र फाळके यांनी शरद पवार गटाचा निरोप घेतल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष आणखी उफाळल्याचे दिसते.





