पुणे – नांदेड या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर २०२५ पासून पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास तातडीने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
ही एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन प्रदेशांमधील प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुकर होणार आहे.
प्रवासात तब्बल तीन तासांची बचत – सध्या पुणे–नांदेड दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे १० तासांचा कालावधी लागतो.
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ ७ तासांत पूर्ण होईल, म्हणजेच प्रवाशांचा सुमारे तीन तासांचा वेळ वाचणार आहे.
संपूर्ण अंतर सुमारे ५५० किमी आहे.
उद्घाटनाची तारीख लवकरच -नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या मार्गासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता.
त्यावर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाडीचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाव्य थांबे आणि मार्ग – ही वंदे भारत एक्सप्रेस पुढील प्रमुख स्थानकांवर थांबू शकते:
पुणे, दौंड, कुईवाडी, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर आणि नांदेड.
या मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार, शिक्षण, उद्योग, कृषी आणि पर्यटन क्षेत्रांना मोठा फायदा होईल.
तिकीट दर आणि प्रवास सुविधा – एसी चेअर कार: ₹१,५०० ते ₹१,९०० एक्झिक्युटिव्ह क्लास: ₹२,००० ते ₹२,५००
ही गाडी आठवड्यातून पाच ते सहा दिवस धावेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नांदेडला मिळणार दुसरी वंदे भारत
नांदेड शहराला डिसेंबरमध्ये दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.
याआधी मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती.
आता पुणे–नांदेड वंदे भारत सुरू झाल्यानंतर, दोन्ही शहरांमधील प्रवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





