पुणे – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये उमेदवारीचा गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून “महायुती एकत्र लढणार का?” या प्रश्नावर येणाऱ्या परस्परविरोधी विधानांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
प्रसार माध्यमांसमोर “महायुती एकत्र लढेल” असे सांगितले जात असले, तरी पक्षांच्या मेळाव्यांमध्ये मात्र “स्वतंत्र लढाईस तयार रहा” असा संदेश दिला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही “नेमका कोणता झेंडा घ्यावा?” असा प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी महायुतीच्या संयुक्त लढतीचे संकेत दिले होते. मात्र, अलीकडच्या बैठकीत दोन्ही नेत्यांकडून स्वतंत्र लढतीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली. विशेषतः अजित पवार यांनी पुण्यातील माजी नगरसेवकांच्या अनौपचारिक बैठकीत “राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल” अशी भूमिका घेतल्याचे समजते.
गत निवडणुकांतील निकालांवर नजर टाकल्यास, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुती म्हणून लढल्यास भाजपच्या गणितांवर धोका निर्माण होऊ शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांपुढे आता उमेदवारीची अनिश्चितता आणि गोंधळ दोन्ही वाढले आहेत.





