नाशिक – शहर पोलिसांनी अलीकडेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर केलेल्या कडक कारवाईनंतर, अनेकांनी जिल्हा सोडून पसार होण्यात धन्यता मानली आहे. त्यात भाजपचा ‘बाहुबली’ पदाधिकारी म्हणून ओळख असलेला विक्रम नागरे याचा माफीनामा असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
बॅनर प्रकरणातून दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून नोंद झालेल्या गुन्ह्यानंतर नागरेने व्हिडीओत म्हटले आहे — “माझी चूक झाली, मी पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची माफी मागतो.”
या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व माजी नगरसेवक योगेश किरण शेवरे, भाजप पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे आणि अंबादास अण्णा त्र्यंबक जाधव या तिघांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय परवानगीशिवाय महापालिकेच्या जागेवर अंबादास जाधव यांच्या वाढदिवसाचे फलक लावून व्यापारी व शाळकरी वर्गात दहशत निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर हे तिघेही फरार असून, पोलिसांना विक्रम नागरे उत्तर भारतातील एका राज्यात लपल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेण्याचे नियोजनही केले होते. मात्र, त्याने शहराबाहेरच राहणे पसंत केले.
दरम्यान, ‘बाहुबली’चा माफीनामा व्हायरल झाल्यानंतर नाशिकमध्ये या प्रकरणावर जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत.





