मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2026 मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या माहितीनुसार, मे ते डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यातील विविध सेवांच्या मुख्य परीक्षा पार पडणार आहेत.
5 ते 9 मेदरम्यान महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 घेण्यात येईल. त्यानंतर 16 मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 तसेच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 होणार आहेत. या तिन्ही परीक्षांचे निकाल ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर केले जातील.
17 मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, तर 7 जून रोजी गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा होईल. या दोन्ही परीक्षांचे निकाल सप्टेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 31 मे रोजी घेण्यात येणार असून, निकाल ऑगस्टमध्ये घोषित केला जाईल. दरम्यान, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) परीक्षांचे तपशील आयोग स्वतंत्रपणे जाहीर करणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ही 3 ते 24 ऑक्टोबर 2026 दरम्यान पार पडणार असून, तिचा निकाल ऑगस्ट 2027 मध्ये जाहीर होईल. तसेच, 15 नोव्हेंबर 2026 रोजी विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, कृषी सेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 घेण्यात येणार आहेत. त्यांचे निकाल फेब्रुवारी ते मार्च 2027 दरम्यान जाहीर होतील.
याशिवाय, 21 नोव्हेंबर 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2026 आयोजित करण्यात येईल. त्यांचा निकाल मार्च 2027 मध्ये प्रसिद्ध होईल. शेवटी, 26 ते 30 डिसेंबर 2026 दरम्यान महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2026 होणार असून, निकाल एप्रिल 2027 मध्ये जाहीर केला जाईल, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.





