सातारा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. “ही योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजित दादा आहेत, तोपर्यंत आमच्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “आमचं सरकार हे विकासाभिमुख आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही इतिहासातील सर्वात मोठं — ₹32 हजार कोटींचं पॅकेज दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या भाऊबीजीसाठी मदत सातत्याने मिळत राहील. कुठल्याही परिस्थितीत या योजना बंद होऊ देणार नाही.”
वीज सवलत आणि उपसा सिंचनाला नवा बळ
फडणवीस यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना पाच वर्षांपर्यंत विजेचे बिल भरावे लागणार नाही. आम्ही विजेवर मोठी सवलत दिली आहे आणि तुम्ही आमचं ‘कॉन्ट्रॅक्ट’ रिन्यू केलंत तर आणखी पाच वर्ष ही सवलत सुरू राहील.”
ते म्हणाले, “राज्यातील उपसा सिंचन योजना आता सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत सौरऊर्जाकरण पूर्ण करून शेतकऱ्यांना वर्षभर, दिवसा 12 तास मोफत वीज मिळेल. वीज बिल थकबाकीमुळे अडथळे येणार नाहीत, अशा पद्धतीने या योजनांना बळ देण्याचं काम आम्ही करत आहोत.”





