नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. न्यायमूर्ती गवई 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्याआधीच त्यांनी न्याय परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
सरन्यायाधीशांची ही शिफारस केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आली असून, यानंतर देशाच्या 53 व्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची औपचारिक कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.
परंपरेनुसार उत्तराधिकाराची शिफारस
भारताच्या न्यायव्यवस्थेत अशी परंपरा आहे की, कार्यरत सरन्यायाधीश आपल्या निवृत्तीपूर्वी पुढील सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींचे नाव सरकारला शिफारस करतात. त्यानुसार गवई यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
भूषण गवई आणि सूर्यकांत — दोघेही न्यायविश्वातील मान्यवर
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी 14 मे 2025 रोजी 52 वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली होती. त्याआधी 51 वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले होते.
गवई यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे.
भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींसाठी निवृत्तीचे वय 65 वर्ष निश्चित आहे. हीच नियमावली सरन्यायाधीशांनाही लागू आहे.





