नाशिक – अवकाळी पावसाने नुकतीच शेती उद्ध्वस्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा बळीराजावर संकट ओढावले आहे. सप्टेंबर महिन्यातील अवकाळीनंतर ऑक्टोबरअखेरच्या पावसाने पुन्हा जिल्ह्यातील शेतीला तडाखा दिला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
द्राक्षबागा, कांदा, कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादक पट्ट्यात कोट्यवधी रुपये खर्च करून जगविलेल्या बागांवर आता कुऱ्हाड फिरण्याची वेळ आली आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने फवारण्या कराव्या लागत आहेत.
द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान
नाशिकसह बागलाण, मालेगाव, चांदवड, दिंडोरी, येवला, इगतपुरी या भागात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान केले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकांवरही पावसाचा फटका बसला असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने शेंगा काळवंडल्या आहेत.
आदिवासी पट्ट्यात वरई पिकावर संकटाची छाया
कळवण व सुरगाणा तालुक्यांतील आदिवासी पट्ट्यात वरई पिकावर टांगती तलवार आहे. पाण्यामुळे पिके आर्द्र झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ओलसर हवामानामुळे साठवलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.





