जळगाव – शहरातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आता आणखी एक मोठी भर पडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षेच्या यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काही दिवसांपूर्वीच मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्यानंतर आता जळगावातील या चोरीमुळे खडसे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे.
एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असून, जळगावातील घर काही दिवसांपासून बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तळमजला आणि पहिला मजला उचकून सर्व खोल्यांमधील कपाटे फोडली. घरातील सामान अस्ताव्यस्त केले असून, कपाटातील कपडे, पर्स, दागिने आदी वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा सुरू आहे.
खडसेंची प्रतिक्रिया
या संदर्भात एकनाथ खडसे म्हणाले, “माझ्या रुममधून सुमारे 20 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 35 हजार रुपये रोख चोरीस गेले आहेत. तसेच मुलगा गोपाळच्या रुममधून त्याच्या पत्नीची गहुपोत आणि सुमारे सात-आठ तोळे सोने चोरीस गेले आहे. रक्षा खडसे यांची रुमही उचकलेली आहे. वॉचमन सुट्टीवर असल्याने चोरी नेमकी केव्हा झाली हे सांगता येत नाही,” अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे समजते.




