मुंबई – राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार राज्यात दररोज सरासरी 61 बालकांवर अत्याचार होत असून, त्यापैकी 24 बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
2023 मध्ये राज्यात बालकांवरील अत्याचाराचे एकूण 22 हजार 390 गुन्हे नोंदवले गेले होते. 2022 च्या तुलनेत ते एक हजार 628 ने अधिक आहेत. संपूर्ण देशात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वाटा सुमारे 13 टक्के आहे. गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश 22 हजार 393 गुन्ह्यांसह प्रथम, तर महाराष्ट्र 22 हजार 390 गुन्ह्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर लाख बालकांमागील गुन्ह्यांचा दर लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दहाव्या स्थानी असून, येथे दर लाख बालकांमागे 61 गुन्हे नोंदले गेले आहेत. सर्वाधिक गुन्ह्यांचा दर अंदमान आणि निकोबार बेटे (143.4), दिल्ली (140.3), चंदिगड (90.7), आसाम (84.2) आणि मध्य प्रदेश (77.9) मध्ये आहे.
क्राय संस्थेच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक बालकांवरील गुन्ह्यांनुसार मुंबईत जिल्ह्यात (3,110), ठाण्यात (1,638), पुण्यात (1,234), मीरा-भार्इंदरमध्ये (1,016) आणि पुणे ग्रामीण (878) जिल्ह्यांमध्ये नोंदले गेले आहेत. लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अपहरणांचे प्रमाण अधिक
राज्यातील गुन्ह्यांमध्ये 12 हजारांहून अधिक गुन्हे अपहरणाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर, आठ हजारांहून अधिक गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत, ज्यात मुंबईत 1,110, ठाणे 447, पुणे 431, पुणे ग्रामीण 400 आणि मीरा भार्इंदर-वसई विरारमध्ये 333 गुन्हे नोंदले गेले आहेत.





