मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केली आहे. सलग चौथ्या वर्षी करण्यात आलेल्या या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षीच परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली होती. ती परंपरा यंदाही कायम ठेवत मार्च 2026 च्या परीक्षांसाठी शुल्क वाढविण्यात आली आहे. मार्च 2025 मध्येच मंडळाने 12 टक्के वाढ केली होती, आणि आता पुन्हा दरवाढ लागू केली आहे.
नवीन दरानुसार दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 470 रुपयांवरून थेट 520 रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 490 रुपयांवरून 540 रुपये इतके करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर प्रमाणपत्र, गुणपत्रक लॅमिनेशन व इतर सेवा यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार असल्याने पालकांच्या खिशावर अधिक आर्थिक ताण येणार आहे.
शिक्षण मंडळाकडून प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा संचालनावरील खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर होणार आहे.





