बीड – राज्यात भाजपने पुन्हा एकदा आपले राजकीय बळ वाढवले असून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांना मोठे खिंडार बसले आहे. बीड, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणेच बदलली आहेत.
बीड जिल्ह्यातील माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे गटाला रामराम देत भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई मतदारसंघात ही मोठी घडामोड ठरली आहे. बदामराव पंडित यांनी पुतणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका करत, “गेवराईची जनता मलाच खरी आमदार मानते,” असा दावा केला. तसेच भविष्यात भाजपाची राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नाही आणि तेच पुढील विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यातील दोन माजी आमदार आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, तसेच लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटास मोठा फटका बसला आहे.
तर रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड आणि महाड, पोलादपूर, माणगाव भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या तिहेरी राजकीय प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद राज्यभर वाढताना दिसत आहे, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसते आहे.



