यावल – शहरातील नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ व ६ तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एम. आय. एम. पक्षाकडे उमेदवार आहेत. जिल्हा निरीक्षकांनी निवडणूक लावण्यासाठीची परवानगी तसेच पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढवली जाईल म्हणून पक्षाने एबी फॉर्म द्यावे, अशी मागणी शहरातील एमआयएमच्या कार्यकत्यांनी जिल्हा निरीक्षकांकडे केली आहे. सध्या एम. आय. एम. चे जिल्हा निरीक्षक शारीक नक्शबंदी निवडणूक आढावा घेण्यासाठी शहरात आले असता त्यांच्याकडे अर्ज दिले. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचे देखील उमेदवार असतील
का ? याकडे आता लक्ष लागले आहे. नक्शबंदी हे यावल नगर पालिकेच्या निवडणूक संदर्भात आढावा घेण्यासाठी आले असता त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष आबिद खान, उपाध्यक्ष वसीम खान, अॅड. आलिम शेख, रियाज शेख आदींनी शहरातील पक्षाच्या स्थिती संर्दभात माहिती दिली. यावल शहरातील वार्ड क्रमांक १ ते ६ हा मुस्लिम बहुल भाग आहे. तसेच मुस्लिम अल्पसंख्यांक, मागासवर्गीय यांची शहरात मोठ्या प्रमाणावर संख्या असल्यामुळे वॉर्ड क्रमांक १ ते ६ आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी पक्षाला संधी असल्याचेही सांगण्यात आले.
उमेदवार मागणीचे अर्ज वरिष्ठांकडे पाठवले जातील व त्यानंतर निर्णय होईल असे पक्षाचे निरीक्षकांना यावेळी सांगितले.
मुस्लिमबहुल भागात काँग्रेसला बसेल फटका?
शहरातील वॉर्ड क्रमांक १ ते ६ मध्ये पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. यात जर एमआयएमने उमेदवार दिले, तर येथे काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. तसेच जर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी देखील उमेदवार त्यांनी दिला तर तो उमेदवार अनेकांची गणित बिघडवू शकतात अशी सध्याची प्राथमिक स्थिती आहे.
यावल शहराच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार असतील का याकडे शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





