रावेर – लालबाग (ता. जि. बुरहानपूर) येथील तब्बसुम बी. शेख सादिक (वय ४५) या महिलेला गंभीर आजारातून नवजीवन प्राप्त झाले आहे. त्यांच्या पोटात निर्माण झालेला तब्बल ३५ सेंमी लांबीचा आणि २ किलो ६२० ग्रॅम वजनाचा मोठा गोळा (ट्युमर) यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला.
ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया डॉ. मिलींदकुमार वानखेडे (एम.एस. सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. अतुल भारंबे यांच्या सहकार्याने पार पडली. संपूर्ण शस्त्रक्रियेस सुमारे चार तासांचा कालावधी लागला. या वेळी डॉ. संध्या वानखेडे, भूलतज्ञ डॉ. निलेश पाटील, आणि असिस्टंट पूजा गुप्ता ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होते.
तब्बसुम शेख यांना गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन तपासणीत त्यांच्या पोटात मोठा गोळा असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीत हा ‘रिट्रो-पेरिटोनियल सारकोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या ट्युमरमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, डावी किडनी निकामी झाल्याने ती सुद्धा शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर पोटातून काढलेल्या ट्युमरचे नमुने पुढील तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या तपासण्या ‘श्री सद्गुरू लॅब’ यांच्या सहकार्याने पार पडणार आहेत.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तब्बसुम शेख यांना नवजीवन प्राप्त झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.





