मुंबई – महाराष्ट्रातून पावसाने पूर्णपणे रजा घेतली असून, आता राज्यावर गुलाबी थंडीची चादर पसरली आहे. हवामान कोरडे झाले असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा १४ अंशांच्या खाली गेल्याने गारठा जाणवू लागला आहे.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे कृषी महाविद्यालयात सर्वात नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर जळगावमध्ये १०.८ अंश, तर नाशिक, जेऊर, निफाड, महाबळेश्वर, वाशीम आणि अमरावती येथे किमान तापमान १४ अंशांच्या खाली घसरले.
ब्रह्मपुरी येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले असून, राज्यातील कमाल तापमानातही हळूहळू घट होत आहे. सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी धुके व गारठा जाणवतो, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारपासून तापमानात आणखी २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात येणारा आठवडा थंडीची लाट घेऊन येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.





