मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत चिंताजनक घडामोडी झाल्या असून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या ते हृदयविकारतज्ज्ञ डॉ. देव बी. पहलाजानी यांच्या देखरेखीखाली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत उपचार करत आहे.
सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा पसरल्या होत्या. मात्र, धर्मेंद्र यांच्या टीमकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,
> “धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणाखाली असून कृपया त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी,”
असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची रुग्णालयात उपस्थिती असून, त्यांच्या मुलींना अमेरिकेतून तातडीने बोलावण्यात आले आहे. त्या मंगळवारी सकाळी मुंबईत पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाल्या व डॉक्टरांशी चर्चा केली.
सिनेविश्वातील अनेक मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. काही कलाकारांनी प्रत्यक्ष रुग्णालयात भेट देऊन देओल कुटुंबाला दिलासा दिला.
लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनीदेखील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट देऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
त्यांनी सांगितले की,
> “धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत. पुढील 24 तास अत्यंत निर्णायक आहेत, परंतु ते लवकर बरे होतील, अशी आशा आहे.”
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तसेच मंदिरांमध्ये त्यांच्या आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना सुरू केल्या आहेत.
संपूर्ण बॉलिवूड या दिग्गज अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आहे.





