मुंबई – राज्य सरकारने २०२४ मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि महायुती सरकारला याचा मोठा राजकीय लाभ मिळाल्याचं मानलं जातं.
अलीकडेच या योजनेबाबत “ती बंद होणार” अशा चर्चांना जोर आला होता. विरोधकांनीदेखील या योजनेवर टीका केली होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की,
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि खंड न पाडता सुरू राहणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितलं की, या योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे सरकार ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार करत नाही.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार, असा प्रश्न अनेक महिलांकडून विचारला जात आहे. सूत्रांनुसार, हा हप्ता महिनाअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला देण्यात येऊ शकतो. राज्यात डिसेंबर महिन्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने निधी वितरण त्याआधी किंवा लगेच नंतर होण्याची शक्यता आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.





