कल्याण – कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण भागांनंतर आता कल्याणसारख्या गजबजलेल्या शहरात बिबट्याच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रोहण–वाहोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून, या बिबट्याने परिसरातील कुत्र्यांवर आणि जनावरांवर हल्ले केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून बिबट्याची हालचाल या परिसरात सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभाग आणि प्राणीमित्र पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू केली आहे.
परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत, तसेच तज्ञ अधिकारी आणि स्थानिक ग्रामसुरक्षा समित्या एकत्रितपणे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने काही सूचना आणि खबरदारीचे उपाय जारी केले आहेत —
-
एकटे बाहेर फिरू नये,
-
लहान मुलांना एकटे सोडू नये,
-
हातात काठी ठेवावी,
-
मोबाईलवर गाणी किंवा आवाज वाजवत हालचाल करावी.
बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सध्या संपूर्ण रोहण–वाहोली परिसरात वनविभाग आणि ग्रामस्थांनी मिळून शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून, काही ठिकाणी नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कल्याण परिसरातही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





