मुंबई – पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावरही दिसून येणार आहे. त्यामुळे या भागांत रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जळगाव जिल्ह्यात आधीच तीव्र थंडीची लाट जाणवत असून, बुधवारी सकाळी नीचांकी तापमान ९.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही तापमान घटू लागले आहे. डहाणू, मालेगाव, बीड, तसेच विदर्भातील इतर शहरांत आणि ग्रामीण भागात थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत शनिवारपर्यंत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
कोरड्या हवेमुळे तापमानात झपाट्याने घट
जळगाव जिल्हा कोरड्या हवेच्या पट्ट्यात असल्याने वातावरणातील ओलावा अत्यल्प आहे. बंगालच्या उपसागरातून येणारी ओलसर हवा कोरड्या हवेच्या दबावामुळे आत येऊ शकत नसल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. रात्री कोरडी हवा वेगाने थंड होत असल्यामुळे तापमानात झपाट्याने घट होत असून, नागरिकांना तीव्र थंडीचा अनुभव येत आहे.
हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी सांगितले की, ही स्थिती १७ नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील किमान तापमान आणखी घसरून ८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
आर्द्रतेचा थंडीशी थेट संबंध
जिल्ह्यात रात्री आर्द्रता ६० ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढते, तर दिवसा ती ३० ते ४९ टक्क्यांपर्यंत घटते. रात्री वाढणारी आर्द्रता थंडी वाढवण्यास कारणीभूत ठरत असून, पहाटेच्या वेळी गारठा अधिक तीव्र जाणवतो. आर्द्र हवा थंड हवेशी संपर्कात आल्याने उष्णता नष्ट होते आणि त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात हाडे गोठवणारा गारवा निर्माण होतो.
हवामान खात्याने नागरिकांना थंडीपासून संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी रात्रीच्या वेळी उबदार कपडे वापरण्याचा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.





