लिमा (पेरू) – दक्षिण पेरूमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पिकअप वाहनाला धडकून २०० मीटर खोल दरीत कोसळली, यात ३७ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू, तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हा अपघात अरैक्विपा प्रदेशातील कारावेली प्रांतात झाला. अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रादेशिक आरोग्य व्यवस्थापक वॉल्टर ओपोर्टी यांनी सांगितले की, “या अपघातात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून २४ प्रवासी जखमी झाले आहेत.” हा अपघात दक्षिण अमेरिकन देशातील गेल्या काही दिवसांतील सर्वात भीषण अपघातांपैकी एक मानला जात आहे.
लामोसास कंपनीची ही बस चाल शहरातून अरैक्विपाकडे जात होती. प्रवासादरम्यान एका तीव्र वळणावर बसने समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट २०० मीटर खोल दरीत कोसळली.
स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये बसचा चक्काचूर झालेला अवशेष दिसत असून, अग्निशमन दल आणि बचावपथकाचे कर्मचारी जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवताना दिसत आहेत.
पोलीसांनी अपघाताची नोंद करून चौकशी सुरू केली असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.





