मुंबई – दक्षिण मुंबईत एका ३५ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेला तिच्याच ओळखीतील विवाहित ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित ड्रायव्हर पीडित महिलेसोबत त्याच घरात काम करत होता. दोघेही बिहारचे रहिवासी असून, एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपीला बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये आरोपीने धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेला फोर्टमधील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला ड्रग्ज मिसळलेले पेय दिल्याचा आरोप आहे. बेशुद्ध झालेल्या महिलेवर आरोपीने अत्याचार केला आणि त्याचे फोटो-व्हिडिओ काढले.
या आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे आरोपीने महिलेला धमकावत वारंवार अत्याचार केला. अखेर त्रासाला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय अनिल राठौड आणि पीएसआय वसंती जाधव यांच्या पथकाने आरोपीला बालेश्वर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडील मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. आरोपीने इतर कोणालाही अशाप्रकारे त्रास दिला आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.





