बिहार – निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक भक्कम झाली आहे. या निकालानंतर भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती प्रलंबित आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा हे मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा वाढीव कार्यकाळही समाप्त झाला आहे.
बिहारमध्ये एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीमध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलांची चर्चा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.
येत्या काही आठवड्यांत केंद्रीय तसेच राज्यस्तरावर खांदेपाटल होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षपदातील संभाव्य बदलांसह राज्यातील नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.





