जळगाव – भडगाव पोलिसांनी अल्पावधीत एका गंभीर प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुखरूप सुटका केली आहे. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एकाच कुटुंबातील या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
मुली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मात्र तिघींचेही मोबाइल फोन बंद असल्याने तपास गुंतागुंतीचा बनला. दरम्यान, जळगाव रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.२२ वाजता मुली तीन संशयित तरुणांसह तिकीट घराजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी झेलम एक्सप्रेस सुटत असल्याची नोंद मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा राजस्थानकडे केंद्रित केली.
तांत्रिक तपासाच्या आधारे मुली राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भडगाव पोलिसांनी तातडीने पथक अलवरला रवाना केले. पोलिसांनी तेथे छापा टाकून तिन्ही मुलींची सुरक्षित सुटका केली आणि रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे आणि अमोल ईश्वर सोनवणे या तिघांना ताब्यात घेतले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या पथकाने प्रभावीपणे पूर्ण केला असून पुढील चौकशी सुरू आहे.





