बिहार – विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उचलून धरलेला मतचोरीचा मुद्दा पूर्णपणे फोल ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा लोकसभेनंतर या निवडणुकीतही प्रभावी ठरला आहे. संध्याकाळी आठपर्यंतच्या निकालांनुसार भाजपने 80, जेडीयूने 67, एलजेपीने 16 तर राजदने 20 जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे एआयएमआयएमने 5 जागांवर मुसंडी मारली. काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या असून पक्षाच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतिहास रचणारे मतदान
243 जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले. तब्बल 66.91% मतदान होऊन गेल्या 75 वर्षांतील सर्वोच्च विक्रम झाला. महिलांच्या मतदानाचा टक्का तब्बल 8.80% ने वाढला. त्यामुळे हा वाढलेला मतदानाचा कल कोणाच्या पारड्यात जाईल याकडे देशाचे लक्ष लागले होते.
विरोधकांनी मतदार पुनरिक्षण मोहीम (SIR) आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “मत अधिकार यात्रा” काढण्यात आली होती. गर्दी मोठी असूनही ती मतांमध्ये परिवर्तित करण्यात महागठबंधन अपयशी ठरले.
टपाल मोजणीत ‘काँटे की टक्कर’
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात टपाल मोजणीत भाजप–जेडीयू–राजद यांच्यात कठीण लढत पाहायला मिळाली. तिन्ही पक्षांचे किमान 70 उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत होते. कधीकधी जेडीयू तर कधी भाजप आघाडी घेत होते. राजदनेही काही वेळा आघाडी घेतली होती. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोजपासाठी सुरुवातीला परिस्थिती प्रतिकूल होती.
EVM मोजणी सुरू झाल्यानंतर चित्र बदलले आणि एनडीए उमेदवार निर्णायकपणे आघाडीवर गेले. दुपारी अडीचपर्यंत राजदची आघाडी झपाट्याने घसरली आणि एनडीएने सरकार स्थापनेच्या दिशेने मजबुतीने वाटचाल केली.
मोदी–शहा यांची रणनीती ठरली फायद्याची
NDAतील भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवली, तर लोजपाला 29 जागा देण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची रणनीती आखण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह स्टार प्रचारकांनी मोठ्या प्रमाणात सभा केल्या. तसेच महिलांच्या खात्यात थेट 10 हजार रुपये जमा करून त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यामुळे मतांचा कल NDAकडे वळला.
तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या सभांना गर्दी होती, मात्र ती मतांमध्ये बदलू शकली नाही.
राहुल गांधींची प्रतिक्रिया : “निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती”
निकालानंतर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले :
“बिहार निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. महागठबंधनावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो मतदारांचे मी आभार मानतो. हा निकाल आश्चर्यकारक आहे. आम्हाला विजय मिळवता आला नाही, पण ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील.”





