वडिगोद्री – येथील छत्रपती संभाजीनगर–बीड राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी सुमारास अडीच वाजता झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला.
हैदराबाद (तेलंगणा) येथून केमिकल घेऊन शहागडकडून वडिगोद्रीकडे जात असलेली पिकअप (क्र. MH-17 BY 4955) समोरून चाललेल्या उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. धडक एवढी जोरदार होती की पिकअपचा समोरचा भाग पूर्णपणे चेंगरला गेला.
अपघातात किरण अशोक सोनवणे (रा. बोरगव्हाण, ता. नेवासा, जि. अहील्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनाचे केबिन आतपर्यंत दाबले गेल्याने मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठा प्रयत्न केला, मात्र यश न आल्याने वाहनाचा चेपलेला भाग दोरीच्या सहाय्याने ओढून काढण्यात आला. त्यानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
शहागड येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या; मात्र नंतर वडिगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली.
अपघात राष्ट्रीय महामार्गावर घडल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आणि बराच वेळ ट्रॅफिक खोळंबा पाहायला मिळाला.





