मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. बिहार निवडणुकीतील
निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसने आता मुंबई पालिकेत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या या मागणीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की, आगामी निवडणुकीत सर्व 227 वॉर्डांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे.
मुंबईत ‘लक्ष्य 2026’ अभियानांतर्गत झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिबिराला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित होते. शिबिरात बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीत न लढता, स्वबळावर लढवावी, अशी ठाम भूमिका मांडली.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की,
“ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची असल्याने मी त्यांची बाजू काँग्रेस प्रभारींकडे मांडली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की,
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार, कंत्राटदारांची लॉबी आणि निधीचा गैरवापर याविरोधात काँग्रेस आगामी काळात आक्रमक पवित्रा घेणार आहे. तसेच, महाविकास आघाडी समान कार्यक्रमावर आधारित असली तरी काही पक्षांतून घेतली जाणारी आक्रमक व बळजबरीची भूमिका काँग्रेसच्या विचारधारेत बसत नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मनसेला लगावला.





