यावल- राज्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या २४२ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावल नगरपालिकेतही निवडणूक रणधुमाळीने वेग घेतला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आल्याने फेगडे दांपत्य आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शहरात उमेदवारांच्या हालचालींना अधिक वेग आला आहे.
यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष, माजी नगरसेवक व यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक उमेश फेगडे यांच्या पत्नी सौ. रोहिणी उमेश फेगडे या अधिकृतरीत्या अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजते. दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ साठी उमेश रेवा फेगडे स्वतःची उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या नावाबाबत अनिश्चितता असल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता रोहिणी फेगडे यांचे नाव पुढे येताच नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपकडून ठामपणे लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावल शहरात पक्षातून जवळपास १२ ते १३ उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे, तसेच यावल शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार असल्याचे पक्षाने जाहीर केले असून, त्यामुळे अर्ज दाखल प्रक्रियेदिवशी मोठी गर्दी अपेक्षित आहे.





