पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उभे केलेल्या १६ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, “बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका असे मी सांगितले होते.”
यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, “पक्षाकडून कुठेही उमेदवार उभा करा असा आग्रह नव्हता. आम्ही प्रचारालाही गेलो नाही. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार उमेदवार उभे करण्यात आले. पक्षश्रेष्ठीकडून या निवडणुकीकडे विशेष लक्ष देण्यात आले नव्हते.”
मोदींचे ‘गंगा ते गंगासागर’ लक्ष्य ; पश्चिम बंगाल निवडणुकीकडे दृष्टिक्षेप
बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रित केले असल्याची चर्चाही सुरू आहे. बिहारमधून वाहणारी गंगा पश्चिम बंगालमध्ये मिळते, असा उल्लेख करून मोदींनी ममता बॅनर्जी यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहेत, त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसतो. फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होऊ शकणाऱ्या बंगाल निवडणुकीत भाजपचे प्रदर्शन चांगले राहील. अगदी सरकार बनण्याचीही शक्यता आहे.”
अजित पवार यांनीही मोदींच्या ‘गंगा ते गंगासागर’ घोषणेचा उल्लेख योग्य असल्याचे म्हटले.
महायुती स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढवणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
ते म्हणाले,
“नऊ वर्षांनंतर निवडणुका लागल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणे कठीण होते. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी अलायन्स शक्य आहे, पण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आम्ही स्वबळावरच लढत आहोत. आवश्यक वाटल्यास तडजोडही केली जाईल.”





