फरिदाबाद – दिल्लीतील कार स्फोट प्रकरणात ठार झालेल्या दहशतवादी उमर संदर्भात नवे तपशील समोर आले आहेत. उमरने हरियाणातील फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाजवळ एक घर भाड्याने घेऊन त्यातच बॉम्ब निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.
तपासात उघड झाले की, उमरच्या घरात स्फोटकांपासून बॉम्ब तयार करणे, सहकाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देणे आणि प्रयोगशाळा चालवणे हे प्रकार सुरू होते. पाकिस्तानमधून व्हिडिओद्वारे मार्गदर्शन मिळत असल्याची माहितीही समोर आली आहे.
भारतीय तपास यंत्रणा उमरच्या हालचालीवर लक्ष ठेवत असल्याची खबर मिळाल्याने उमर घाईगडबडीत आयईडी कारमध्ये बसवत होता. काम नीट न झाल्याने कार लाल किल्ल्याजवळ पोहोचताच स्फोट झाला आणि उमर ठार झाला. डीएनए चाचणी करून त्याचा मृतदेह ओळखल्यानंतर तपासाचा धागा पुढे सरकला.
त्यानंतर तपास पथकाने फरिदाबादमधील घरावर छापा टाकून 358 किलो आणि 2563 किलो स्फोटके अशा मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. मोठ्या दहशतवादी कटाला हे साहित्य वापरले जाणार होते. पण वेळेत कारवाई केल्याने मोठे संकट टळले.
नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट
जप्त केलेली काही स्फोटके चाचणीसाठी नौगाम पोलिस स्टेशनमध्ये ठेवली होती. तपासणीदरम्यान अचानक स्फोट झाला. बॉम्बमध्ये धातूचे तुकडे नसल्याची माहितीही तपास यंत्रणांनी दिली. हा स्फोट फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.





