जळगांव – मागील काही दिवसांपासून हुडहुडी थंडीचा अनुभव घेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात आता अचानक उकाड्याची लाट जाणवत आहे. उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या आणि चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे राज्यासह जळगावातील तापमानात अचानक वाढ झाली असून थंडी पूर्णपणे ओसरली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत रात्रीच्या तापमानात तब्बल ६ ते ७ अंशांची वाढ नोंदवली गेली आहे.
अलिकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली होती, ज्यामुळे जळगावात थंडीची तीव्रता प्रचंड वाढली होती. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे तापमान ७.१ अंशांवर घसरत २३ वर्षांचा विक्रम मोडला होता. दिवसाही घरात स्वेटरची गरज भासत होती. मात्र मागील चार दिवसांत तापमान सातत्याने वाढल्याने थंडीची चाहूलच उरली नाही. ढगाळ वातावरणामुळे थंड वारे अडवले गेल्याने थंडी कमी होऊन उकाडा वाढला आहे.
थंडी पुन्हा कधी परतेल?
सध्याची ही बदललेली स्थिती २६ ते २७ नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या या उकाड्यापासून जळगावकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पुन्हा थंडीचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तापमानाच्या नोंदीनुसार, जळगाव शहरात रात्रीचे तापमान लक्षणीय वाढले आहे. २० नोव्हेंबर रोजी ते ९ अंशांवर होते, तर २४ नोव्हेंबर रोजी त्यात वाढ होऊन तापमान १६ अंशांवर पोहोचले. केवळ चार दिवसांत ७ अंशांची उडी नोंदली आहे. त्याचबरोबर दिवसा तापमान २ अंशांनी वाढून ३१ अंशांपर्यंत गेले आहे.





