यावल प्रतिनिधी : फिरोज तडवी – यावल तालुक्यातील साकळी गावात विजवितरण विभागाकडून नागरिकांच्या तीव्र विरोधाची दखल न घेता जबरदस्तीने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने आज कळस गाठला. गावकऱ्यांनी अचानक विजवितरण कार्यालयावर धडक देत ठाम आवाजात आपला आक्रोश नोंदवला. मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा रोष ज्वालामुखीप्रमाणे फुटून बाहेर पडल्याचे चित्र दिसले.
अभियंता अनुपस्थित – संतप्त नागरिकांचा प्रश्न : “कोणाकडे करायची तक्रार?”
शेकडो नागरिक विजवितरण कार्यालयात पोहोचले असताना अभियंता यादव कार्यालयात अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला. नागरिकांनी कर्मचारी वर्गासमोर आपल्या अडचणी, आक्षेप आणि संतापाची सविस्तर मांडणी केली.
ग्रामस्थांच्या प्रतिनिधी फैसल खान यांनी अखेर फोनवर अभियंता यादव यांच्याशी संपर्क साधला. वाढत्या दडपणामुळे अभियंत्यांनी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्पुरते थांबवावे, असा मौखिक आदेश फोनवरून दिल्याची माहिती समोर आली.
फोनवरून आदेश – रोषात आणखी भर
लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेकडो नागरिक उपस्थित असताना
अभियंता मात्र कार्यालयात अनुपस्थित…
आणि आदेशही फक्त फोनवरून!
या गोष्टीमुळे नागरिकांचा रोष अधिकच भडकला.
“जनतेसमोर न येता फोनवरूनच आदेश? हीच का प्रशासनाची जबाबदारी?”
असा सवाल नागरिकांनी उचलून धरला.
30 नोव्हेंबरची बैठक निर्णायक ठरणार
उद्या, ३० नोव्हेंबर रोजी नागरिक–अभियंता यांची बैठक होणार असून स्मार्ट मीटरच्या सक्तीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे.
ही बैठक केवळ साकळीच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेत आहे.
नागरिकांचे स्पष्ट प्रश्न :
सरकार म्हणते सक्ती नाही – मग विजवितरण विभाग जबरदस्ती का?
बिल वाढले तर जबाबदारी कोण घेणार? वापर, दंड, कपात यावर स्मार्ट मीटरचा भविष्यात काय परिणाम होणार? ग्राहकांना विचारात न घेता हा निर्णय कोणाच्या आदेशावर?
साकळीमध्ये आंदोलनाची ठिणगी पेटली!
आजच्या धडक मोर्च्याने एकच संदेश दिला— साकळीतील नागरिक स्मार्ट मीटरची सक्ती मान्य करणार नाहीत! उद्याच्या बैठकीनंतर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असून स्मार्ट मीटरविरोधातील हा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.





