नागपूर – प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून एअर इंडिया एक्सप्रेसने नागपूर–बेंगळुरू मार्गावर आज, १ डिसेंबरपासून दररोज दोन विमानसेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्ससोबत आता प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या इंडिगोची नियमित सेवा चालू असून तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर आणि बेंगळुरू दरम्यान सातत्याने वाढत असलेली प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसने या मार्गावर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
उड्डाणांचे वेळापत्रक
एअरलाइन्सने जाहीर केलेल्या पत्रकानुसार—
बेंगळुरू → नागपूर : सकाळी ७.२५ सायंकाळी ६.३०
नागपूर → बेंगळुरू : सकाळी १०.०० रात्री ९.०५
महाराष्ट्रातील विस्तार वेगाने
या नव्या सेवेमुळे महाराष्ट्रात एअर इंडिया एक्सप्रेसचा विस्तार अधिक बळकट झाला आहे.
सध्या— मुंबईतून आठवड्याला १३०+ उड्डाणे पुण्यातून आठवड्याला ९०+ उड्डाणे
चालवली जात आहेत. यात आता नागपूरच्या सेवांचा समावेश झाला आहे.
नवी मुंबईतूनही लवकरच नवीन सेवा
एअर इंडिया एक्सप्रेस लवकरच नवी मुंबई विमानतळावरून बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या मार्गांवर उड्डाणे सुरू करणार आहे. बेंगळुरूहून अलीकडेच अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूर मार्गांवर सेवा सुरू झाली असून आता नागपूरही या जाळ्यात जोडले गेले आहे. बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेससाठी झपाट्याने वाढणारे प्रमुख केंद्र बनले असून येथून आठवड्याला ५३०पेक्षा अधिक उड्डाणे होत आहेत.
बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद सेवा सुरू करण्याची घोषणा होताच फक्त तीन दिवसांत ६०% सीट्स बुक झाल्या.
यावरून या मार्गावरची मागणी किती प्रचंड आहे, हे स्पष्ट होते. या सेवेसाठी १८० आसनी विमान वापरले जाणार असून व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात नागपूर–बेंगळुरू प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.





