गोंदिया – तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे शनिवारी संध्याकाळी शेतात वडिलांसोबत गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९) असे आहे.
रुची आपल्या वडिलांसोबत शेतात गेली होती. वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत असताना रुची बांधावर उभी होती. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर ओढत नेले.
रुचीच्या किंकाळ्या ऐकून वडील व शेजारी शेतकरी धावत आले. आरडाओरड होताच बिबट्याने रुचीला सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.
गंभीर जखमी अवस्थेत रुचीला तातडीने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री ८ वाजता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
देशभरात बिबट्यांचे हल्ले वाढले? उत्तर प्रदेशात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बळी
दरम्यान, उत्तर प्रदेशातही रविवारी अशीच एक भीषण घटना घडली असून देशभरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बालरामपूर जिल्ह्यात दीड वर्षांचा मुलगा आईच्या शेजारी झोपलेला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले. कुटुंबीयांच्या आरडाओरडीनंतर त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला, परंतु बिबट्या अंधाराचा फायदा घेत मुलाला घेऊन जंगलात पळून गेला.
नंतर मुलाचा मृतदेह घरापासून १५० मीटर अंतरावर जंगलाच्या आत आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस व वनविभागास माहिती दिली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले असून त्या बिबट्याचा शोध सुरू आहे.
घटना रहारपुरवा झाऊहना, बंकतवा जंगलक्षेत्रात रविवारी पहाटे २ ते ३ दरम्यान घडली. संबंधित कुटुंब लग्नसमारंभासाठी गावात आले होते.





