रावेर तालुका प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या तीन–चार दिवसांपासून थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तापमानाचा पारा १० अंशांवर स्थिरावल्यानं रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. थंडी वाढल्याने शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत.
राज्यभर थंडीचा जोर कायम असताना मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल या तालुक्यांमध्येही तिचा परिणाम प्रकर्षाने जाणवत आहे. या भागात पारंपरिकरीत्या केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून केळीवर आलेल्या संकटामुळे उत्पादक अडचणीत सापडले आहेत. परिणामी केळीची लागवड कमी होत असून, खऱिप आणि रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदा रब्बी हंगामात मका हे नगदी पिक म्हणून सर्वाधिक लोकप्रिय ठरले असून, त्यानंतर हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या तालुक्यांमध्ये सुमारे ५० टक्के बागायती क्षेत्र असले तरी जुन्या केळीदरम्यान पेरणीसाठी मका हेच पिक अधिक पसंत केले जात असल्याचे दिसते. जाणकार शेतकरी सांगतात की हरभरा शेतीचा दर्जा सुधारतो, तर दुसरीकडे मका पुढील पिकावर प्रतिकूल परिणाम करतो. तरीही यावर्षी मक्याची लागवड वाढती आहे.
थंडी वाढल्यामुळे रब्बी पिकांमध्ये अंतर मशागतीला वेग आला असून कोळपणी, निंदणी, फवारणी यांसारखी कामे आता जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यांना अनुकूल हवामानाचा फायदा मिळाल्यास यंदाचा रब्बी हंगाम उत्पादनदृष्ट्या समाधानकारक ठरेल, अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.





