मुंबई : मिरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
एमएमआरडीएच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सरनाईक बोलत होते. बैठकीस महानगर आयुक्त आश्विनकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणीय आणि स्थानिक आक्षेपांमुळे निर्णय
डोंगरी कारशेड प्रकल्पासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असल्याने झाडतोड, वाहतूककोंडी आणि परिसराच्या विकास आराखड्यावर होणाऱ्या परिणामाबाबत स्थानिक ग्रामस्थ, नागरिक, विविध संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी सातत्याने आक्षेप नोंदवले होते. या सर्व मुद्द्यांचा सखोल आढावा घेतल्यानंतर पर्यायी जागांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल, असा निर्णय शासनाने घेतल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
अधिसूचना जाहीर झाल्यानंतर कारशेडसाठी पर्यायी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली जाईल. मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक नियोजन हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रो 9 चा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता
एमएमआरडीएच्या 13.5 किमी लांबीच्या मेट्रो 9 प्रकल्पासाठी डोंगरी येथे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव होता. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास येत असून दहिसर–काशीगाव हा मार्ग डिसेंबरमध्ये सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एलिव्हेटेड पार्किंग लॉटची पर्यायी योजना
मेट्रो 9 साठी कारशेडऐवजी पर्यायी म्हणून एलिव्हेटेड पार्किंग लॉट उभारण्याच्या योजनेवरही बैठकीत चर्चा झाली. हे पार्किंग लॉट मार्गाच्या शेवटच्या स्टेशनवर—सुभाषचंद्र बोस मैदानावर— उभारण्याचा प्रस्ताव आहे. या डिझाइननुसार सुमारे आठ मेट्रो गाड्या येथे थांबू शकतात. त्यामुळे नवीन जागेवर मोठा कारशेड उभारण्याची गरज कमी होऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.





