अमळनेर : अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी परिसरात एका तरुण आणि अल्पवयीन मुलीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये दिनेश बद्री पावरा (२२, रा. हिंगोणे जळोद) आणि १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार दिनेश हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर काम करत होता, तर मुलगी मजुरीचे काम करत होती.
देवळी येथील आयटीआय कॉलेजच्या मागील भागात असलेल्या झाडाजवळ हे दोन्ही मृतदेह आढळले. देवळीच्या पोलिस पाटलांनी याबाबत अमळनेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून ते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू असल्याचे पोलिसांनी निरीक्षणात सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये आपसातील संबंधांची शक्यता व्यक्त करण्यात येत असून घटनेमागील कारणांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पुढील तपास करीत आहेत.





