पुणे : महर्षीनगर परिसरात पीएमपी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शाळकरी मुलावर किरकोळ वादातून धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात १४ वर्षांच्या मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून आरोपी फरार आहेत. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
स्वारगेट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा कोंढव्यातील बधेनगर परिसरात राहतो. सोमवारी, १ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो घरी परतत असताना पुजारी उद्यानाजवळील पीएमपी थांब्यावर थांबला होता. त्याच वेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आला आणि विनाकारण रागाने पाहत अचानक हातातील धारदार हत्याराने मुलाच्या दिशेने वार केला. मुलाने आरडाओरडा करताच तो व्यक्ती दोन साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम व गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसाट पुढील तपास करीत आहेत.
पर्वती परिसरातही शाळकरी मुलावर हल्ला
पर्वती येथील नीलायम थिएटरजवळदेखील एका शालेय विद्यार्थ्यावर जुन्या वैमनस्यातून चार तरुणांनी हत्याराने वार केला. १६ वर्षीय मुलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुलाची दुचाकी बंद पडल्याने त्याने मित्राला बोलावण्यासाठी फोन केला होता. याचदरम्यान चार युवक तेथे आले आणि पूर्वीच्या वादाच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केला. ही घटना गेल्या महिन्यात घडली असून, तक्रार नुकतीच दाखल करण्यात आली आहे. पर्वती पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
टिळक रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत तरुण डॉक्टरी प्रशिक्षणार्थीचा मृत्यू
टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात भरधाव टेम्पोच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. मृत तरुणीची ओळख आरिबा कुरेशी (वय २०, रा. न्यू मोदीखाना, लष्कर) अशी आहे. आरिबा कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती.
या घटनेबाबत तिचे वडील अर्शदअली अख्तरअली कुरेशी (वय ५५) यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी टेम्पोचालक विश्वंभर दशरथ सोनवणे (वय ६२, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.





