गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून बुधवारी चलनाने आतापर्यंतचा सर्वात नीचांक गाठला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९० चा टप्पा ओलांडून 90.1325 वर घसरला. दिवसाची सुरुवातही रुपया 89.96 वरून झाली होती. यापूर्वीच्या सत्रात रुपया 89.87 वर बंद झाला होता.
रुपयातील तीव्र घसरणीचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. कमकुवत चलनामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींबाबत अनिश्चितता वाढल्याने निफ्टी आणि सेन्सेक्स मागील काही सत्रांपासून घसरणीचा कल दर्शवत आहेत.
सामान्य नागरिकांवर परिणाम
डॉलर मजबूत झाल्याने आयात महाग होते. भारत पेट्रोल, डाळी, खाद्यतेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं आणि यंत्रसामग्री यांसारख्या अनेक वस्तू आयात करतो. त्यामुळे आगामी काळात—
पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता खाद्यतेल व डाळी महाग होणे इलेक्ट्रॉनिक्स व संगणक उपकरणांच्या किंमती वाढणे सोन्याचा दर आणखी वाढणे परदेशी शिक्षण व प्रवास खर्चिक होणे यामुळे घरगुती बजेट विशेषतः स्वयंपाकघराचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.





