धरणगाव – पंचायत समिती धरणगाव येथील ग्रामीण गृहनिर्माण विभागातील अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि त्याचा साथीदार सागर कोळी या खाजगी व्यक्तीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दुसरा हप्ता जारी करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारास २०२४–२५ मध्ये परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी घराचे काम पूर्ण केले. मात्र दुसरा हप्ता न आल्याने त्यांनी पंचायत समितीत चौकशी केली असता अभियंता पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले.
दरम्यान, गावातील इतर नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याची माहिती समजताच तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. त्यावेळी अभियंता पाटील यांनी दुसरा हप्ता देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम आपला साथीदार सागर कोळी मार्फत स्वीकारली जाईल, अशी कबुलीही त्यांनी फोनवर दिल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गु.क्र. ३९१/२०२५ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ प्रमाणे ४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो. ना. बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे, यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई पूर्ण केली.





