जरंडी, ता. सोयगाव (ग्रामिण प्रतिनिधी – शफिक शेख) – जरंडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीर संकटात आले असून शैक्षणिक गुणवत्ता मोठ्या प्रमाणात बाधित होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शाळेत इयत्ता 1 ते 8 वीपर्यंतचे वर्ग चालत असले तरी फक्त चारच शिक्षक उपस्थित असल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
शाळेची अधिकृत वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ अशी असली तरी दुपारच्या सत्रात काही विद्यार्थी रस्त्यावर फिरताना दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावरून शाळेत योग्य देखरेखीचा अभाव आणि शिस्तीचा प्रश्न प्रकर्षाने पुढे येत आहे.
याकडे शालेय समितीचे अध्यक्ष गुरुदास पाटील तसेच इतर सदस्य यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांकडून आरोप करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.





